4 Jul 2015

माझा जीवन प्रवास

नुकताच प्रदर्शित झालेला किल्ला चित्रपट पाहून चित्रपटगृहाच्या बाहेर पडलो ते मनात असंख्य विचार आणि प्रश्न घेऊनच. काही चित्रपट विचार करायला लावतात त्या पंक्तीत किल्ला चित्रपटाला बसवण्यात काही हरकत नाही. कदाचित इतरांप्रमाणे मीही माझ्या आयुष्याची थोडी जुळवाजुळव चित्रपटच्या कथेशी जुळवून पाहिली आणि त्यातूनच काही जुन्या गोष्टी आठवल्या किवा म्हटलं तर आतापर्यंतचा जीवन प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला.

लहानपणीच वडिलांचे छत्र  हरवले, त्यांचा चेहरा हि मला नीटसा आठवत नाही, आईने घरात कधीच वडिलांचा फोटो लावला नाही कदाचित आम्हाला त्यांची आठवण येणून आम्ही निराश होऊ नये असा काहीसा त्यामागचा उद्देश असावा असा मला प्रकर्षाने वाटते. मी आजही आईला तो प्रश्न विचारला नाही कदाचित विचारेल कि नाही हे ही मला माहित नाही. लहान वयातच पुढे मांडून ठेवलेल्या आयुष्याचे ओझे आणि असंख्य निरुत्तरित प्रश्न माझ्या वाटेला वाढून ठेवले आहेत हि जाणीव तेव्हा झाली आणि हे सर्व पेलण्यास मी तयार झालो. बराचसा वेळ एकटाच घालवायचो कारण तेव्हा मित्र ही कमी होते. आईने नेहमीच साथ दिली प्रत्येक गोष्टीत माझी  मुलं पुढे कशी राहतील ह्या एकाच गोष्टीने तिला खिळून ठेवले होते आणि तिचा एकटीचा लढा चालू होता तो फक्त आमच्यासाठी. आम्ही फक्त आणि फक्त पहात होतो. घरची परिस्तिथी बिकट असूनही आईने कधी आम्हाला कामावर धाडले नाही तुम्ही शिका मी काय ते बघेन असे नेहमीच तिचे म्हणणे असायचे. आणि तिच्या ह्याच स्वप्नांचे ओझे आम्ही आमच्या खांद्यावर घेतले आणि शिक्षण पूर्ण केले.

परिस्थितीने बऱ्याच गोष्टी शिकवल्या, आपली कोण परकी कोण हे यातूनच शिकलो. आपली माणसं अगदी बोटावर मोजण्याइतकीही नाहीत हेही तेव्हाच लक्षात आले. खूप वाईट वाटायच जेव्हा आपलेच लोक आपला फायदा घेताना दिसायचे पण हळू हळू त्याची सवय झाली. हळूहळू मी माझा सारं बालपणीच दुख विसरून गेलो. वडिलांची कमी आईने कधीच भासू दिली नाही त्यामुळे कदाचित वडील ह्या शब्दाला लोक एवढी किमत का देतात हे मला अजूनही कळले नाही किवा यापुढे कळणार हि नाही.

लहानपणी पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरे मोठे झाल्यावर मिळत गेली तर काही प्रश्न बालपणासोबतच संपून गेली. आयुष्याचा अर्धा प्रवास दुखात गेला म्हणण्यापेक्षा जगण काय आहे हे शिकण्यात गेलाय ह्याच गोष्टीचा मला हेवा वाटतो. आज बरच काही कमावलंय आईचे प्रेम, मित्रांची सोबत, व्यसनं, वाचन, लेखन, प्रवास, आणि बरंच काही जे आता बोटावर मोजण्याच्याही पलीकडे गेलय आणि मी सुखात आहे हे सांगण्यात आज आनंद होतो आहे.

आयुष्याचा पुढचा प्रवास आणखी परीक्षा घेणारा आहे हे नक्किच कारण पुढे मी ही कोणाचा तरी बाप होणार आहे. आणि बाप म्हणजे नक्की काय हे मी परिस्तिथीमुळे कधी जाणूच शकलो नाही, त्यामुळे ते कर्तव्य, ते प्रेम, त्या माझ्याच कणखरपणामध्ये कदाचित माझ्याच वडिलांचे प्रेम मी अनुभवेल यात तिळमात्रही शंका नाही.


 माझ्या आयुष्याचा प्रवास काही इतका ही हलाखीचा न्हवता जितका आज इतर बऱ्याच जणांचा आहे. तरीही थोड लिहावास वाटल म्हणून लिहिले आणि माझा त्या करोडो मायबापांना सलाम जे ह्या प्रवासातल्या प्रत्येक प्रसंगांना सामोरे जातात फक्त आपल्या मुलांसाठी.

 सुशांत बनकर. 

तू आणि शब्द...!!!!


तुझ्याशिवाय या कवितेला ही काही अर्थ नाही,

एक वेळ होती जेव्हा तू माझ्या सोबत होतीस,
आणि माझ्या प्रत्येक कवितेला फक्त तुझ्हीच चाहूल होती,
मग कधी चंद्र सुर्यालाही शब्दात बांधले होते,
तर कधी याच शब्दांनी तुझ्या सौंदर्याला ही फुलवले होते,

कधी तुला लाजताना पाहून या शब्दांनाही लाजवेसे वाटले होते,
तर कधी तुझ्या रागालाही याच शब्दांनी सावरले होते,
तुझ्यासोबत जगलेले प्रत्येक क्षण या शब्दांनी  ही अनुभवले होते,
तर कधी तुझ्या आठवणीत याच शब्दांना मी रडतानाही पहिले होते,

आज तू नाहीस तर माझे हे शब्द ही पोरके झाले आहेत,
आणि आज पुन्हा ते फक्त तुझ्याच शोधात आहेत,
तू नाहीस तर माझ्या या शब्दांना ही काही किंमत नाही,
खरच तुझ्याशिवाय माझ्या या कवितेला काहीच अर्थ नाही...!!!  

13 Jun 2015

आठवण

आठवण

आज कागदावर सगळे दुख रेखाटण्याचा प्रयत्न केला,
पण दुखासमोर शेवटी कागदही अपुराच पडला,
आठवणीनी तिच्या मनाला आणखी एक खोटा दिलासा दिला,
आणि दुख अनुभवायला आणखी एक मार्ग मोकळा करून दिला,

प्रत्येक दिवसाची सुरवात तिच्याच विचाराने सुरु होते,
आणि रात्रीलाही दिवसा मागोमाग तिच्याच आठवणींची चाहूल लागते,
तिच्या आठवणींत रमायला या मनाला कोणत्याच कारणांची गरज नसते,
पण स्वतःमध्ये रमायला, या मनाला रोज नवीन कारणे शोधायची गरज भासते,

आता या मनालाही काही समजावू शकत नाही,
कारण तिच्या आठवणींशिवाय त्यालाही करमत नाही,
मग या मनाच्या हट्टासमोर शेवटी मलाच हार मानवी लागते,
कारण तिच्या आठवणीत शेवटी त्यालाच जास्त रडावे लागते....!!!

चांदण्या रातीतील भेट


एका चांदण्या रातीतील आपली ती भेट असावी,
एका चांदण्या रातीत तुझ्याशी बोलण्याची इच्छा तर खूप आहे,
तू माझ्यासमोर असावी आणि फक्त बोलताच राहावी,
आणि मी..
आणि मी फक्त तुलाच पाहत राहावे,
मग लाजेने हळूच तुझी नजर झुकावी,
आणि मी आणि मी तुझी तीच नजर पुन्हा शोधू पहावी,
मग प्रेममय झालेल्या या वातावरणात एक शांतता पसरावी,
आणि त्या पसरलेल्या शांततेलाही मग तुझीच चाहूल लागावी,
 चांदण्या या रातीत तुझे रूप इतके फुलावे की
तुला पाहणाऱ्या त्या चंद्रालाही स्वतःचीच लाज वाटावी,
माझ्या  प्रत्येक शब्दात फक्त तू आणि तूच असावी,
आणि तुझ्यासोबत असताना मला कसलीच जाणीव नसावी,
खरच चांदण्या रातीतील ती आपली भेट अशीच काहीशी असावी,
आणि ती  आठवण म्हणून मी सदैव मनात जपावी...!!!!

प्रवासातला पाऊस

आज उठायाला थोडा उशीरच झाला. काल मित्राच्या लग्नात छत्री हरवली हे दु:ख विसरून मी कपाटात ठेवलेला जुना रेनकोट काढला. तसा हा रेनकोट नावालाच बाकी तो घालून मी पूर्ण भिजणार ह्याची पूर्ण खात्री मला होती. उद्या जा भिजत हे आईचे कालचे शब्द खरे करायला पाऊस माझी बाहेर वाट पाहतच होता आणि मी घराबाहेर पडलो.

सुदैवाने रिक्षासाठी २ जोडीदार लगेच मिळाले आणि मी पावसाला चिडवत माझ्या प्रवासातला एक टप्पा पार करून स्टेशन वर पोहोचलो. कदाचित माझ्या चिडवण्याचा पावसाला जर जास्तच राग आला आणि मघासपासून रिमजिम बरसणारा पाऊस थोडा जास्तच बरसू लागला. काहीजण काय मस्त पाऊस पडतोय, साला आज पण ट्रेन लेट अश्या काही खास टिपिकल मुंबईकर भाषेत या पावसाला गोंजारत होते. ते शब्द कानावर घेत घेत समोरून येणारी ट्रेन दिसली. खास मुंबईकरांसाठी बनवलेली नवीन ट्रेन आज माझ्या स्वागताला आली. क्षणात मघाशी पावसाला कोसनारे नवीन आलेल्या ट्रेनचे गुणगान गाऊ लागले आणि माणूस किती विक्षिप्त वागू शकतो याचा अनुभव आला. मुळात तुम्ही मुंबईकर म्हणून जन्माला आलात तेव्हा हा गुण तुम्हाला जन्म:तहाच मिळालेली देण आहे आणि त्याबद्दल पुढे काही न बोलेलेच बरे.

रोज आतमध्ये जाऊन बसणारा मी आज दारातच खोळंबलो, म्हटल आज दारात उभा राहून प्रवास करूया. मी भिजणार हे माहित असूनही मी दारात का उभा राहतोय या प्रश्नाचे उत्तर मला तेव्हा मिळालेच नाही, कदाचित ते मिळणार ही नाही. बऱ्याचदा काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात त्याबद्दल जास्त विचार न करता तो प्रश्न माझ्या न मिळालेल्या प्रश्नसंचात जमा केला.

प्रवास सुरु झाला, आणि पावसाचे अगणित थेंब झेलण्यास मी सज्ज झालो, कदाचित पाऊस ही तितकाच आतुरलेला मला भासला. क्षणात मी चिंब भिजलो, एखाद्या सुईसारखे पावसाचे थेंब वेदना देत होते पण त्यातही एक वेगळीच मज्जा होती. प्रत्येक होणारी वेदना ही दुःख न देत काही वेदना विलक्षण असा आनंद देतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा पाऊस. दारात उभा असल्याने माझे अर्धे अंग बाहेर आणि अर्धे आत होते आणि माझ्यातल्याच दोन भिन्न मनाची थोडी ओळख मला झाली. एक सांगत होत मी किती नशीबवान मस्त या पावसाचा आनंद लुटतोय तर दुसरा म्हणत होत मुर्ख आत ये आपल्याला ऑफिसमध्ये जायचंय. यांचा हा खेळ मी असाच चालू ठेवला कधी थोडा आता कधी थोडा बाहेर करत करत प्रवास चालू ठेवला.

अंधेरी स्टेशन वर काही कॉलेज मंडळी दिसली अगदी उत्साही माझ्याच डब्यात चढले मरीन ड्राईव वगैरे काही शब्द कानावर पडले अन नकळत मी स्वतःला मरीन ड्राईवच्या कट्ट्यावर नेहून बसवलेही. उधानलेला समुद्र, थंड वाऱ्याचा स्पर्श, अंगावर काटे आणणारी ती थंडी या सर्वात पुन्हा मी स्वतःस थोडा हरवून बसलो. पण दुसऱ्याच क्षणी कॉलेज जीवनात उनाडक्या करणाऱ्या या मनाला आज ऑफिस/पैसा नावाच्या व्यवस्थेने पूर्ण बांधून ठेवलय याची बोचरी जाणीव झाली आणि त्या कट्ट्यावरून मी पुन्हा आपल्या त्या ट्रेनच्या दरवाजात आलो.

प्रवास चालूच होता मनात विचार ही चालूच होते. माझ्यासोबत पावसात सारीच माझी सुख-दुःख भिजत होती. भिजलेली दु:ख ही आज मनाला आनंद देत होती जुने साठवणीतले प्रत्येक क्षण मी अनुभवत होतो. पुढचे स्टेशन दादर असे शब्द कानावर पडताच विचारांची गाडी मंदावली. कुठे तरी दडलेले क्षण थोड्या वेळेसाठी का होईना पण मी पुन्हा अनुभवले. स्वतःशीच थोडा हसलो कारण मी आज एक प्रवास फक्त स्वतःसोबत केला होता.  
सुशांत बनकर.  

4 Apr 2015

रात्रीतली तुझी आठवण...!!!!


रात्रीचा चंद्र आणि चांदण्यांची रात्र,
आणि या रात्रीच्या सोबतीला तुझ्या आठवणींचे सत्र,
मग कधी या कुशीवर तर कधी त्या कुशीवर झुलत राहयचे,
आणि डोळे घट्ट मिटून फक्त तुला आठवत राहयचे,
झोप येत नाही म्हणून खिडकीत उभे राहयचे,
आणि आकाशातल्या चमचमणाऱ्या प्रत्येक ताऱ्यात पुन्हा तुलाच शोधू पहायचे,
या प्रत्येक ताऱ्यात तुझे बहुरूप अनुभवायचे,
आणि हा तारा माझा तो तारा माझा करत प्रत्येक ताऱ्याला आपले करायचे,
मग हळूच नजर त्या चंद्राकडे फिरवायची,
आणि अबोल अश्या त्या चंद्राकडे फक्त तुलाच मागायचे,
दिवस तर कशाही सरतो,
पण माझी प्रत्येक रात्र मी अशीच काहीशी जगतो,
कधी या चंद्र ताऱ्यांकडे रोज तुला मागायचे,
तर कधी तुझ्या आठवणीत स्वतःशीच काही तरी पुटपुटआयचे,
आता फक्त दोनच इच्छा मनात आहेत,
एकतर पुन्हा तुझा होऊन तुझ्यासाठी जगायचे,
नाहीतर कधी ही न संपणाऱ्या या रात्रीत रोज स्वतःला मरताना पहयाचे..!!!!

माणूस आणि वागणूक…

नुकताच  ऑफिस मध्ये घडलेला एक किस्सा, ऑफिसमध्ये  तसे कोणाशी जास्त बोलण नाही काही मोजक्याच लोकांशी ते ही कामाशी  निगडीत… त्यातूनही थोडा वेळ मिळाल्यास हलके आणि मिश्किल असे विनोद… पण त्या विनोदांचा एखाद्यावर इतका परिणाम होतो कि विनोद करणाऱ्याच्या वागणुकीकवर  सरळ सरळ संशय घेतला जातो… अश्या विवेकशून्य बुद्धीमत्तेवर हसावे कि रडावे याचाच गंभीर असा प्रश्न मला पडला आणि खरच आपलं  काही चुकते का या गोष्टीचा विचार मनात घोळू लागला. 

अजूनही उत्तर काही सापडले नाही कदाचित सापडणार ही नाही कारण स्वतःच्या चुका माणसाला सहजरीत्या समजणं तसा कठीणच. असो पण अश्या विवेकशून्य लोकांशी मराठी भाषेत म्हणाव तर डील कसा कराव हा कदाचित जास्तच स्पर्धात्मक असा भाग मला वाटतो. ज्या व्यक्तीला तुम्ही नावाशिवाय जराही ओळखत नाही त्यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उचलण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला हाच प्रश्न मला इथे आवर्जून विचारावासा वाटतो.

माझ्यामते अश्या लोकांनी जरा त्यांचा समाजातला वावर वाढवावा, मग त्यांना वागणूक या शब्दाचा खरा अर्थ सापडेल. हाय स्टेटस मध्ये जगणाऱ्या या लोकांना समाज या शब्दाचा अर्थ ही तितक्याच आशयाने समजावणे किवा त्यांनी तो स्वतःहून समजून घेणे गरजेचे आहे असे मला वाटते. खरंतर कोणी कसे वागावे हे सांगण्या इतका मी काही मोठा संत किवा अगदी सावरकरांसारखा क्रांतीकारी नाही. पण समाजात कसे वागवे याचे ज्ञान मला नकीच अवगत आहे.

मला नेहमीच असं वाटत जरा माणसांनी स्वतःच्या न वापरलेल्या बुद्धीचा थोडा वापर करावा आणि विनोद, वागणूक, बोलणं, ज्ञान, आपुलकी, भावना यातला फरक समजून आणि अनुकरून मग यथ्हेछ अशी टिपणी करावी, पण  त्याचसोबत ती उलघडून सांगण्याची बोद्धीक ताकद ही त्यांच्यात असावी. एखाद्याच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे त्याच्या अब्रूचे लख्तरे तोडल्यासारखेच आहे असे मला वाटते. असो प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळी असते कोणी कसे वागावे बोलावे हा ज्याच्या त्याचा प्रश्न पण आपण या समाजाचे काही देणे आहोत हे विसरता कामा नये जसे आपण इतरांवर टिपणी करतो तसे आपल्यावरही टिपणी करणारे असंख्य लोक या भूतलावर जन्माला आले आहेत हे विसरता कामा नये.

तुमचा अमुल्य वेळ वाया गेल्याबद्दल क्षमस्व:…!!!

सुशांत बनकर.