4 Jul 2015

माझा जीवन प्रवास

नुकताच प्रदर्शित झालेला किल्ला चित्रपट पाहून चित्रपटगृहाच्या बाहेर पडलो ते मनात असंख्य विचार आणि प्रश्न घेऊनच. काही चित्रपट विचार करायला लावतात त्या पंक्तीत किल्ला चित्रपटाला बसवण्यात काही हरकत नाही. कदाचित इतरांप्रमाणे मीही माझ्या आयुष्याची थोडी जुळवाजुळव चित्रपटच्या कथेशी जुळवून पाहिली आणि त्यातूनच काही जुन्या गोष्टी आठवल्या किवा म्हटलं तर आतापर्यंतचा जीवन प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला.

लहानपणीच वडिलांचे छत्र  हरवले, त्यांचा चेहरा हि मला नीटसा आठवत नाही, आईने घरात कधीच वडिलांचा फोटो लावला नाही कदाचित आम्हाला त्यांची आठवण येणून आम्ही निराश होऊ नये असा काहीसा त्यामागचा उद्देश असावा असा मला प्रकर्षाने वाटते. मी आजही आईला तो प्रश्न विचारला नाही कदाचित विचारेल कि नाही हे ही मला माहित नाही. लहान वयातच पुढे मांडून ठेवलेल्या आयुष्याचे ओझे आणि असंख्य निरुत्तरित प्रश्न माझ्या वाटेला वाढून ठेवले आहेत हि जाणीव तेव्हा झाली आणि हे सर्व पेलण्यास मी तयार झालो. बराचसा वेळ एकटाच घालवायचो कारण तेव्हा मित्र ही कमी होते. आईने नेहमीच साथ दिली प्रत्येक गोष्टीत माझी  मुलं पुढे कशी राहतील ह्या एकाच गोष्टीने तिला खिळून ठेवले होते आणि तिचा एकटीचा लढा चालू होता तो फक्त आमच्यासाठी. आम्ही फक्त आणि फक्त पहात होतो. घरची परिस्तिथी बिकट असूनही आईने कधी आम्हाला कामावर धाडले नाही तुम्ही शिका मी काय ते बघेन असे नेहमीच तिचे म्हणणे असायचे. आणि तिच्या ह्याच स्वप्नांचे ओझे आम्ही आमच्या खांद्यावर घेतले आणि शिक्षण पूर्ण केले.

परिस्थितीने बऱ्याच गोष्टी शिकवल्या, आपली कोण परकी कोण हे यातूनच शिकलो. आपली माणसं अगदी बोटावर मोजण्याइतकीही नाहीत हेही तेव्हाच लक्षात आले. खूप वाईट वाटायच जेव्हा आपलेच लोक आपला फायदा घेताना दिसायचे पण हळू हळू त्याची सवय झाली. हळूहळू मी माझा सारं बालपणीच दुख विसरून गेलो. वडिलांची कमी आईने कधीच भासू दिली नाही त्यामुळे कदाचित वडील ह्या शब्दाला लोक एवढी किमत का देतात हे मला अजूनही कळले नाही किवा यापुढे कळणार हि नाही.

लहानपणी पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरे मोठे झाल्यावर मिळत गेली तर काही प्रश्न बालपणासोबतच संपून गेली. आयुष्याचा अर्धा प्रवास दुखात गेला म्हणण्यापेक्षा जगण काय आहे हे शिकण्यात गेलाय ह्याच गोष्टीचा मला हेवा वाटतो. आज बरच काही कमावलंय आईचे प्रेम, मित्रांची सोबत, व्यसनं, वाचन, लेखन, प्रवास, आणि बरंच काही जे आता बोटावर मोजण्याच्याही पलीकडे गेलय आणि मी सुखात आहे हे सांगण्यात आज आनंद होतो आहे.

आयुष्याचा पुढचा प्रवास आणखी परीक्षा घेणारा आहे हे नक्किच कारण पुढे मी ही कोणाचा तरी बाप होणार आहे. आणि बाप म्हणजे नक्की काय हे मी परिस्तिथीमुळे कधी जाणूच शकलो नाही, त्यामुळे ते कर्तव्य, ते प्रेम, त्या माझ्याच कणखरपणामध्ये कदाचित माझ्याच वडिलांचे प्रेम मी अनुभवेल यात तिळमात्रही शंका नाही.


 माझ्या आयुष्याचा प्रवास काही इतका ही हलाखीचा न्हवता जितका आज इतर बऱ्याच जणांचा आहे. तरीही थोड लिहावास वाटल म्हणून लिहिले आणि माझा त्या करोडो मायबापांना सलाम जे ह्या प्रवासातल्या प्रत्येक प्रसंगांना सामोरे जातात फक्त आपल्या मुलांसाठी.

 सुशांत बनकर. 

No comments:

Post a Comment