13 Jun 2015

प्रवासातला पाऊस

आज उठायाला थोडा उशीरच झाला. काल मित्राच्या लग्नात छत्री हरवली हे दु:ख विसरून मी कपाटात ठेवलेला जुना रेनकोट काढला. तसा हा रेनकोट नावालाच बाकी तो घालून मी पूर्ण भिजणार ह्याची पूर्ण खात्री मला होती. उद्या जा भिजत हे आईचे कालचे शब्द खरे करायला पाऊस माझी बाहेर वाट पाहतच होता आणि मी घराबाहेर पडलो.

सुदैवाने रिक्षासाठी २ जोडीदार लगेच मिळाले आणि मी पावसाला चिडवत माझ्या प्रवासातला एक टप्पा पार करून स्टेशन वर पोहोचलो. कदाचित माझ्या चिडवण्याचा पावसाला जर जास्तच राग आला आणि मघासपासून रिमजिम बरसणारा पाऊस थोडा जास्तच बरसू लागला. काहीजण काय मस्त पाऊस पडतोय, साला आज पण ट्रेन लेट अश्या काही खास टिपिकल मुंबईकर भाषेत या पावसाला गोंजारत होते. ते शब्द कानावर घेत घेत समोरून येणारी ट्रेन दिसली. खास मुंबईकरांसाठी बनवलेली नवीन ट्रेन आज माझ्या स्वागताला आली. क्षणात मघाशी पावसाला कोसनारे नवीन आलेल्या ट्रेनचे गुणगान गाऊ लागले आणि माणूस किती विक्षिप्त वागू शकतो याचा अनुभव आला. मुळात तुम्ही मुंबईकर म्हणून जन्माला आलात तेव्हा हा गुण तुम्हाला जन्म:तहाच मिळालेली देण आहे आणि त्याबद्दल पुढे काही न बोलेलेच बरे.

रोज आतमध्ये जाऊन बसणारा मी आज दारातच खोळंबलो, म्हटल आज दारात उभा राहून प्रवास करूया. मी भिजणार हे माहित असूनही मी दारात का उभा राहतोय या प्रश्नाचे उत्तर मला तेव्हा मिळालेच नाही, कदाचित ते मिळणार ही नाही. बऱ्याचदा काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात त्याबद्दल जास्त विचार न करता तो प्रश्न माझ्या न मिळालेल्या प्रश्नसंचात जमा केला.

प्रवास सुरु झाला, आणि पावसाचे अगणित थेंब झेलण्यास मी सज्ज झालो, कदाचित पाऊस ही तितकाच आतुरलेला मला भासला. क्षणात मी चिंब भिजलो, एखाद्या सुईसारखे पावसाचे थेंब वेदना देत होते पण त्यातही एक वेगळीच मज्जा होती. प्रत्येक होणारी वेदना ही दुःख न देत काही वेदना विलक्षण असा आनंद देतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा पाऊस. दारात उभा असल्याने माझे अर्धे अंग बाहेर आणि अर्धे आत होते आणि माझ्यातल्याच दोन भिन्न मनाची थोडी ओळख मला झाली. एक सांगत होत मी किती नशीबवान मस्त या पावसाचा आनंद लुटतोय तर दुसरा म्हणत होत मुर्ख आत ये आपल्याला ऑफिसमध्ये जायचंय. यांचा हा खेळ मी असाच चालू ठेवला कधी थोडा आता कधी थोडा बाहेर करत करत प्रवास चालू ठेवला.

अंधेरी स्टेशन वर काही कॉलेज मंडळी दिसली अगदी उत्साही माझ्याच डब्यात चढले मरीन ड्राईव वगैरे काही शब्द कानावर पडले अन नकळत मी स्वतःला मरीन ड्राईवच्या कट्ट्यावर नेहून बसवलेही. उधानलेला समुद्र, थंड वाऱ्याचा स्पर्श, अंगावर काटे आणणारी ती थंडी या सर्वात पुन्हा मी स्वतःस थोडा हरवून बसलो. पण दुसऱ्याच क्षणी कॉलेज जीवनात उनाडक्या करणाऱ्या या मनाला आज ऑफिस/पैसा नावाच्या व्यवस्थेने पूर्ण बांधून ठेवलय याची बोचरी जाणीव झाली आणि त्या कट्ट्यावरून मी पुन्हा आपल्या त्या ट्रेनच्या दरवाजात आलो.

प्रवास चालूच होता मनात विचार ही चालूच होते. माझ्यासोबत पावसात सारीच माझी सुख-दुःख भिजत होती. भिजलेली दु:ख ही आज मनाला आनंद देत होती जुने साठवणीतले प्रत्येक क्षण मी अनुभवत होतो. पुढचे स्टेशन दादर असे शब्द कानावर पडताच विचारांची गाडी मंदावली. कुठे तरी दडलेले क्षण थोड्या वेळेसाठी का होईना पण मी पुन्हा अनुभवले. स्वतःशीच थोडा हसलो कारण मी आज एक प्रवास फक्त स्वतःसोबत केला होता.  
सुशांत बनकर.  

No comments:

Post a Comment