10 Dec 2011

आठवणीतले कॉलेज

कॉलेज म्हणजे धमाल, कॉलेज म्हणजे मस्ती, कॉलेज म्हणजे मैत्री आणि कॉलेज म्हणजे प्रेम.. कॉलेज म्हटले की अभ्यास कमी आणि या गोष्टी आल्याच पाहिजेत.. त्याशिवाय कॉलेजला आणि तरुणाईला अर्थच राहत नाही.. तुम्हीही ही धमाल मस्ती केलीच असेल.. शाळा सुटल्यावर नवीन मित्र, नवीन वर्ग, नवीन कॅन्टीन सगळे काही नवीन आणि यात बंधनही नाही कोणाचे.. आयुष्यात सगळ्यात आनंदाचे क्षण म्हणजेच कॉलेज..  हेच कॉलेज आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते  आणि मागे ठेवून जातात त्या फक्त आठवणी.. अशीच एक कविता आज माझ्या वाचनात आली, जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.. मी आशा करतो की तुम्हाला ही कविता नक्की आवडेल...    

फ़क्त आठवणीच हाती

कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती

अपरिचित  


No comments:

Post a Comment